Skip to Content

मेढा येथे पारंपरिक बैलबाजारास सुरुवात; ९ ते १८ मार्चदरम्यान बाजार भरणार.

10 March 2026 by
BolPakhad


मेढा : प्रतिनिधी

मेढा येथे सालाबादप्रमाणे जावली-महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती व नगरपंचायत मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पारंपरिक जातीवंत बैलबाजाराचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. होळी ते पाडवा या कालावधीत भरणारा हा बैलबाजार यंदा ९ ते १८ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष रूपालीताई वारागडे, बाजार समितीचे उपसभापती हेमंतजी शिंदे आणि साई विनोद पार्टे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीपजी शिंदे व मेढा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष विकासजी देशपांडे यांच्या हस्ते फीत कापून बैलबाजाराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जावली पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतीभाई देशमुख, बाजार समितीचे संचालक राजेंद्र भिलारे, हणमंत शिंगटे, कमल दळवी, तुकाराम शिंदे, सुंदर भालेराव, सुरेश पार्टे, तसेच नगरसेवक नितीन मगरे, रणधिर गोरे, पुष्पा मुकणे, सोनाली पवार, तेजस्वीनी इगावे, मोनिका जवळ, शर्वरी गायकवाड, सचिन करंजेकर, शांताराम पार्टे, सचिन जवळ यांच्यासह मान्यवर व व्यापारी उपस्थित होते.

या बैलबाजारात खिल्लार जातीचे दर्जेदार बैल व आकर्षक बैलजोड्या हे प्रमुख आकर्षण असते. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी तसेच महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील व्यापारी मोठ्या संख्येने या बाजारात सहभागी होत असतात.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद पार्टे यांच्या वतीने लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याने व्यापारी व जनावरांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्याचाही शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

in News